शनिवार, ऑगस्ट १९, २००६

लोकप्रिय हिमेश रेशमिया

हिमेश रेशमियाची गाणी सध्या एवढी लोकप्रिय का आहेत असा प्रश्न अनेक संगीत-रसिकांप्रमाणे मलाही कधीकधी पडतो.

माझ्या संगीत रसिकतेविषयी: मी थोडेफार हिंदुस्तानी शास्त्रीय गाणे शिकलो आहे. पॉप, रॉक, इत्यादी सर्व प्रकारही ऐकायला मला मनापासून आवडतात.

मलाही खरेतर हिमेश रेशमियाची पुष्कळ गाणी आवडली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कसोटीवर त्याचा आवाज कदाचित फार चांगला ठरणार नाही. पण त्याच्या चाली छान असतात, तो गाण्यामध्ये भावना ओतू शकतो आणि बऱ्याच मंडळींना त्याची गाणी बाथरूममध्ये म्हणता येण्याइतकी सोपी असतात. पुष्कळ लोकांना तो केवळ 'वेगळा' म्हणून आवडत असेल; पण हे कळण्यासाठी हिमेशला काळाच्या कसोटीवर उतरावे लागेल.

लोकांना काय आवडेल याचा रामबाण फॉर्म्युला ठरवणे मला तरी वाटते कठीण आहे. पण असा एखादा फॉर्म्युला उद्या निघाला तर त्या फॉर्म्युल्याला मात्र हिमेशच्या लोकप्रियतेच्या कसोटीवर उतरावे लागेल.

शुक्रवार, ऑगस्ट १८, २००६

॥ माझ्या ब्लॉगचा श्रीगणेशा ॥

बंगलोर की पुणे

मी पुण्याचा आहे. गेली पाच वर्षे बंगलोरला नोकरीसाठी राहतो आहे. पुण्याला परत जायचं हे आल्यापासून मनात पक्कं आहे. मात्र प्रत्यक्ष पुण्याला परत जायचं हा निर्णय फार सोपा आहे असं नाही.

मी ज्या क्षेत्रात काम करतो त्यातल्या दोन-चारच कंपन्या पुण्यात आहेत. पुन्हा पगार आणि काम चांगलं असेल का आणि नसलं तर परत बंगलोरला तर जायला लागणार नाही ना अशी भीती आहेच.

पुण्यात राहणीमान बंगलोरपेक्षा स्वस्त आहे असा माझा गोड गैरसमज होता. पण पुणं आयटी मध्ये मागे नाही हे जगाला पटवून देण्यासाठी पुण्यातील जागांच्या किंमती बंगलोरच्या बरोबरीत वाढल्या आहेत. नाही म्हणायला, घरचं जेवण असेल त्यामुळे बाहेर खाण्याचा खर्च वाचेल.

गेल्या पावसाळ्यात बंगलोरमधील माझ्या राहत्या घरात गटाराच्या पुराचं पाणी शिरलं. यापेक्षा पुणं बरं असं म्हणता म्हणता यंदाचा पावसाळा आला. यावर्षी पुण्यात पूर आणि बंगलोर कोरडं ठणठणीत!

पुण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल न बोललेलंच बरं. त्यावर इतकं लिहून आणि बोलून झालं आहे की त्या शब्दांनी ते खड्डे भरून टाकता येतील. बंगलोरमध्ये मात्र पाऊस न आल्यामुळे नवे कोरे गुळगुळीत डांबरट रस्ते दिमाखात मिरवत आहेत.

थोडक्यात काय तर मूलभूत सोयी-सुविधांच्या कुठल्याही कारणासाठी पुण्याला जाणं विशेष शहाणपणाचं नाही.

पण तरीही पुण्याला तर जाणार आहेच. अश्या असंख्य कारणांसाठी की जी फक्त वेडेपणाचीच आहेत.