मंगळवार, ऑगस्ट ०४, २००९

हिमालयास

तुझी मान ताठ दिसली तरी तुझी नजर नाही करडी
मेघांनी चार अश्रू गाळले की कोसळतात दरडी
साधूंच्या तपस्येबरोबर विरक्तीचा प्रयत्न केलास जरी
हिरव्या वनश्रीतून वाहणारे जीवन सांगते तुझी प्रेरणा खरी
वरकरणी थंड दिसलास तरी तुझं अंतरंग तापलंय

हिमालया, तुझ्यामध्ये काय काय लपलंय?

तश्याच चपळ, तश्याच शुभ्र, रौद्र सुंदर भावतात
विजा जेव्हा तुझ्या अंगावरुन नद्या बनून धावतात
कस्तुरी आणि फुले कितीतरी, गंध हुंगून गातात
गंगेच्या निळ्या आरशात रूप बघत राहतात
डोकं शुभ्र पिकलं तरी तू तरुणपण जपलंय

हिमालया, तुझ्यामध्ये काय काय लपलंय?

तुझं एक शिखर आकाशापर्यंत जातं (आम्हाला सर्वात उंच वाटतं)
ढगांमध्ये डोकं बुडवून चिंब चिंब न्हातं
ढग घरी जातात तेव्हा लख्ख उन्हात दिसतं
तुझ्या प्रत्येक शिखरापलिकडे आणखी उंच शिखर असतं
आम्हीतरी आकाश तुझ्या उंचीनंच मापलंय

हिमालया, तुझ्यामध्ये काय काय लपलंय?

-देवेंद्र देशपांडे
३० जुलै २००५

लेबल: ,

मी एवढंच करतो

श्रावणाची सर
पाडते शब्दांचा सडा
पारिजातकासारखा
त्यातलेच दोन वेचतो
तुर्‍यामधे खोचतो
निळ्या आभाळाखाली
मुग्ध नाचणार्‍या निळ्याच्या

शरदाचे शीतल चांदणे
पिऊन गळलेली दोन आसवे
चकोराच्या तृप्त डोळ्यांतून
साठवतो स्वातीच्या शिंपल्यांतून
मोती अलगद बनून
तेजाळतात तिच्या गळ्यात

शिशिराची शिरशिरी
झाडांची पानगळ
तांबुसलेल्या
त्यांचे तोरण दारी
नव्या आशा, नवी उभारी
नव्या हिरव्या कोंबांची

वसंतात बहरते गाणे
आंब्याच्या मोहराआडून गातो तो सावळा
त्याचेच दोन सूर
आंब्याहून मधुर
शबरीसारखे चाखतो
तापल्या माळावर टाकतो
संध्याकाळच्या गार वार्‍यात

-देवेंद्र देशपांडे
२००२

लेबल: ,

प्रवास

कोण आपण, कुठून आलो
कुठे चाललो, का चाललो?
कुणास आहेत ठाऊक
या प्रश्नांची उत्तरे?

परवाचा वृध्द आजचं मूल
शाश्वत काही? सर्व दिशाभूल
मार्ग दाखवतात?
छे! फसवतात
हे चमचमणारे तारे

कुठली वाट सोपी, कुठली अवघड?
चालावे हळू कि धावावे भरभर?
रमावे जरा कि वहावे
व्यर्थ वचनांचे भारे?

मी आणि माझे सोबती
सुखदुःखाची नाती
वाटेवर काटे
तितकेच गुलाब आहेत खरे

कोण आपण, कुठून आलो?
कुठे चाललो, का चाललो?
बाकी खोटे, चालणे खरे
प्रवासातच आहे सारे

-देवेंद्र देशपांडे
१६ ऑगस्ट २००४

लेबल: ,

वाघाचा माज

पावसानं रान माजलंय मस्त मजेत चरा
हिरव्या कोवळ्या गवतानं पोटं चांगली भरा
व्हा तुष्ट आणि पुष्ट आणि गर्वाने उंडरा
आणि शक्तीच्या कैफात होऊ द्या बेसावध नजरा
(म्हणा) "धारदार शिंगांच्या जवळ येण्याची हिंमत होईल काय?"

वाघाचे का कुणि कधि ऐकलेत वाजलेले पाय?

झाडे हिरवी झाडे पिवळी पाने ताजी पाने सुकली
गवत खुरटे गवत लांब बांबू कवळे बांबू खांब
चिखल वाळला चिखल माजला पाणी आटले पाणी फुगले
ऊन भडकले ऊन हरवले दिवस बुडले दिवस उगवले
चट्टे-पट्टे दोन डोळे सतत रोखलेत दिसले काय?

वाघाचे का कुणि कधि ऐकलेत वाजलेले पाय?

वाटा फसव्या वाटा नागमोडी थोडी सपाटी फार झाडी
कुठे दलदल कुठे खड्डे कुठे पोळी कुठे जाळी
कुठे काटे कुठे वारुळे कुठे वेली कुठे बिळे
फळे विषारी फुले विषारी गवत विषारी किडे विषारी
दिवसाचं ठीक आहे, रात्री कुठे घ्याल ठाय?

वाघाचे का कुणि कधि ऐकलेत वाजलेले पाय?

माझे पंजे माझे सुळे माझ्या बळकट स्नायूंचे पिळे
माझी लव माझी मिशी माझ्या अंगावरची नक्षी
माझी पकड माझी ताकत माझी झडप माझी पाळत
माझे तेज माझा रुबाब माझी जरब माझी भीती
जंगलची कोणतीही वाट माझ्याच गुहेशी जाय!

वाघाचे का कुणि कधि ऐकलेत वाजलेले पाय?

-देवेंद्र देशपांडे
४-ऑगस्ट-२००९

लेबल: ,

॥ लांडग्याच्या मनाचे श्लोक ॥

मना लांडग्या तू सकाळी निजावे । बुडे सूर्य डोळे तसे ऊघडावे ॥
अधी वास घ्यावा उभारून नाक । गुहेतून बाहेर मग काढि डोकं ॥ १ ॥

मना लांडग्या ऐक तू म्होरक्याचे । बरे ऐकणे हीत रे टोळक्याचे ॥
मिळोनि दबा झाडिमागं धरावा । मिळोनि तसा पाठलाग करावा ॥ २ ॥

मिळोनि धिराने धरावे जगावे । मिळोनि धिराने करावे मरावे ॥
मिळोनीच खावे मिळोनीच र्‍हावे । कुणी साद देता मिळोनीच गावे ॥ ३ ॥

मना लांडग्या तू शिकारीस जावे । तुझ्या वाटचे तू गुहेशी आणावे ॥
आधी खाऊ दे बालके आणि माता । तुझा शेवटी राख तू मात्र वाटा ॥ ४ ॥

मना अंधकारी कधि ना निजावे । भुकेसाठी रात्रीस जागे रहावे ॥
मना अंधकारात सामर्थ्य आहे । मना अंधकाराविना व्यर्थ आहे ॥ ५ ॥

नको सूर्य तो स्वच्छ पाडी प्रकाश । नको चंद्र जो स्वच्छ दावी जगास ॥
जगी अंधकारी तुझी भूक भागे । उजेडात पंगूही मारील शिंगे ॥ ६ ॥

कधी चंद्र दिसता आकाशात मोठा । तया ऐकवावा शिव्यांचाच साठा ॥
बुरे बोलता चंद्र लपतो ढगांत । बरे बोलता नासी अंधारी रात ॥ ७ ॥

मना लांडग्या वाट सोडू नये रे । मना क्रूरता काही सांडू नये रे ॥
मना जीव घेता नको बावरू तू । मना जीव जाता नको घाबरू तू ॥ ८ ॥

मना लांडग्या फक्त भूकेस खावे । भरे पोट मग ना कुणाही छळावे ॥
मना वाघ दिसता नदीच्या तटासी । बरे वाट वळवून यावे गुहेसी ॥ ९ ॥

मना लांडग्या रानि अपुल्या रहावे । मना माणसांसी कधि ना दिसावे ॥
मना लांडग्यासारिखे तू जगावे । अखेरी गुहेशी सुखाने मरावे ॥ १० ॥

-देवेंद्र देशपांडे
४-ऑगस्ट-२००९

लेबल: ,

संस्कार

तिन्हिसांजेच्या अंधारातिल
दीपज्योतीच्या तेजामधली
आईबरोबर शुभंकरोती
आठवते आठवते

दिवाळीतल्या थंड पहाटे
फुलबाज्यांच्या रोषणाईतिल
अभ्यंगाचे स्नान ऊबीचे
आठवते आठवते

गायत्रीच्या शुभमंत्रातिल
व्रत घेण्याच्या गांभीर्याने
भिक्षांदेही मागितलेले
आठवते आठवते

शाळेमध्ये सरस्वतीची
मूर्ति गिरविली पाटीवरती
विद्येची पूजा केलेली
आठवते आठवते

आजीच्या मांडीवर बसुनी
कान्हाची गवळण शिकताना
त्याची पहिली झाली ओळख
आठवते आठवते

संस्कारांचे रेशीमधागे
अलगद विणले गेले मागे
वळुन पहाता बालपणीचे
आठवते आठवते

-देवेंद्र देशपांडे
२३-फेब्रुवारी-२००९

लेबल: ,

यमक जुळवता जुळवता

यमक जुळवता जुळवता
जी सांगायचीच राहून गेली
ती सांगण्यासाठी कविता
मी पुढची कविता लिहिली

कुणाची गाथा कुणाची कथा
वेचता-वाचता लिहिली
सामान्य जगण्यातली व्यथा
जगता-जागता लिहिली

आम्हाघरी कुठली
शब्दांची श्रीमंती
थोडे शब्द साठवून
थोडी कर्ज काढून लिहिली

-देवेंद्र देशपांडे
३-जून-२००९

लेबल: ,

टेकडी (च्या ओव्या)

माझ्या घरातून मागे
जाता टेकडी लहान
वाटेवर उंबराशी
बावी भागवी तहान

टेकडीच्या मागे रान
त्यात राघू-मैना-मोर
मुंगूस नि भारद्वाज
देती चांगला शकुन

टेकडीच्या पायथ्याशी
पेरु बागेत पिकतो
पाखरांच्या चोचीतून
माळी उरलं विकतो

टेकडीची आहे माया
जशी थोरली बहीण
ठेच लागून पडता
हळू घेते सांभाळून

जेव्हा आषाढ थांबतो
झरु लागतो श्रावण
साडी हिरवी नेसली
दिसे माहेरवाशीण

टेकडीला जरी ठाव
पायथ्याचं सारं गाव
खास ओळखते वेडी
माझ्या मनातले भाव

पाही टेकडीवरुन
मावळतं सूर्यबिंब
वाटे होऊन पाखरु
इथे घ्यावा पुन्हा जन्म

-देवेंद्र देशपांडे
२२-फेब्रुवारी-२००९

लेबल: ,

ब्रह्म

"मला ब्रह्म कळले, मला ब्रह्म कळले"
असे ओरडून नाचताना, त्याच्या पायी तुडवल्या गेल्या
फुलपाखराच्या वेदनेने इतक्या वर्षांनंतर
त्याच्या डोळ्यांत पाणी आले
आज त्याला थोडेसे ब्रह्म कळले

-देवेंद्र देशपांडे
१८-एप्रिल-२००६

लेबल: ,

गावाच्या वाटेवर

वळणाच्या वाटांनो घेऊन चला लवकर आता
डुबणार्‍या सूर्याजवळच माझा गाव दिसे छोटा

तीन्हीसांजेला आकाशाच्या रंगात भिजुन
थकलेल्या डोळ्यांतिल ओढीच्या पणत्या लावुन
मी पोहोचीन जेव्हा घराकडे दिसतील मला सारी
माझ्या वाटेला आतुर डोळे लावुन बसलेली
सांगेन तयांना मजेत आहे शहराच्या गर्दित
आणखीन समाधानी पगाराच्या पहिल्या वाढीत
भेटी देईन साडी आईला, घड्याळ बाबांना
आणि बहिणीला ड्रेस गर्ली पिंकिश रंगाचा

मग रात्र शांत उगवेल गंध पसरवेल आठवणींचा
न रडता,पडता,धडपडता हुंदडलेल्या बालपणीचा
मग डोळ्याला डोळा लागेल कसा, आई येईल
थोपटताना कौतुक कुठल्याश्या मुलीचेही सांगेल
मी झोपिन थोडा खोटा, थोडा खरा, तरीही जागा

दुसर्‍या दिवशी मित्रांची घरामधे ही- गर्दी होईल
गप्पांच्या खमंग प्लेटा चहामधे बुडवुन खातील
कुणी अजुन परिक्षा देतो आहे, कुणी अजून काहीच नाही
गाडी एकाची अजुन रुळाच्या आसपासही नाही
मी जिंकुन एकच चिंतित दिसतो, बाकी कसे मस्तीत
मी उगाच देतो सल्ला सारे जगा जरा शिस्तीत
आणि अचानक वेळच होईल पुन्हा परत निघण्याची
शहराच्या विहिरित श्वास कोंडवुन बुडी खोल घेण्याची
मी निघेन येईन लवकर सांगून पुढच्या वेळेला

-देवेंद्र देशपांडे
१२ ऑगस्ट २००८

लेबल: ,

आता

सहज आठवले म्हणुन सांगतो
एके काळी मीही निरागस होतो

(तेव्हा)
ना आनंदा कारण लागे
ना अश्रूंची लाज बाळगे
                                                           (आता)
                                                            स्थितप्रज्ञावत दुरूनच मी
                                                            माझे सारे भाव पहातो

श्रध्देवरती होती श्रध्दा
पवित्र वाटे स्तोत्रे म्हणता
                                                            आता ज्ञानाच्या भिंगाने
                                                            संशय ज्ञानावरही घेतो

वेगवेगळे प्राणीपक्षी
आकाशी तार्‍यांची नक्षी
                                                            त्यातील भौतिक-जीव-रसायन
                                                            शास्त्रांमध्ये काही शोधतो

माया, ममता अन्‌ मानवता
जगणे परोपकाराकरता
                                                            माणुसकीचा सुध्दा पैसा
                                                            मोजून देतो मोजून घेतो

सगळी साधी भली माणसे
आणि जीवन सुंदर भासे
                                                            स्वार्थाने भरलेल्या गर्दीत
                                                            थोडा स्वार्थी होऊन टिकतो

काय कमवले, काय गमवले
हिशोब मांडून काय फायदा
बाण धनुष्यी, ज्ञान मनुष्यी
मागे फिरणे नाही कायदा

अज्ञानातिल सुखापरी
ज्ञानातिल दुःखाला स्वीकारुन
फडताळातून अंधार्‍या चिंता
थोडी विश्वाची करतो

- देवेंद्र देशपांडे
२४-मार्च-२००८

लेबल: ,

कविता माझी

मी लिहिणार कविता माझी
आजच सकाळी उमललेली ताजी

कित्येक कवी खोदून गेले कल्पनांची लेणी
कित्येकांना सापडल्या अमोल शब्दांच्या खाणी
अजून तरीही दडून आहे प्रत्येक रानी प्रत्येक पाषाणी
ती मूर्ती घडवायला हातोडा-छिन्नी: माझी बुद्धी, माझी लेखणी

चंद्र-सूर्य-तारे
समुद्र-नद्या-वारे
कदाचित हेच लिहीन सारे
पण बोचल्याशिवाय काटा
आणि चालल्याशिवाय वाटा
मोडणार नाही

आणि लिहीन गाणी
सांगेन प्रेमाची कहाणी
मात्र शाईला असेल कायम
अश्रूंची ग्वाही

-देवेंद्र देशपांडे
१७-एप्रिल-२००६

लेबल: ,

शनिवार, ऑगस्ट १९, २००६

लोकप्रिय हिमेश रेशमिया

हिमेश रेशमियाची गाणी सध्या एवढी लोकप्रिय का आहेत असा प्रश्न अनेक संगीत-रसिकांप्रमाणे मलाही कधीकधी पडतो.

माझ्या संगीत रसिकतेविषयी: मी थोडेफार हिंदुस्तानी शास्त्रीय गाणे शिकलो आहे. पॉप, रॉक, इत्यादी सर्व प्रकारही ऐकायला मला मनापासून आवडतात.

मलाही खरेतर हिमेश रेशमियाची पुष्कळ गाणी आवडली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कसोटीवर त्याचा आवाज कदाचित फार चांगला ठरणार नाही. पण त्याच्या चाली छान असतात, तो गाण्यामध्ये भावना ओतू शकतो आणि बऱ्याच मंडळींना त्याची गाणी बाथरूममध्ये म्हणता येण्याइतकी सोपी असतात. पुष्कळ लोकांना तो केवळ 'वेगळा' म्हणून आवडत असेल; पण हे कळण्यासाठी हिमेशला काळाच्या कसोटीवर उतरावे लागेल.

लोकांना काय आवडेल याचा रामबाण फॉर्म्युला ठरवणे मला तरी वाटते कठीण आहे. पण असा एखादा फॉर्म्युला उद्या निघाला तर त्या फॉर्म्युल्याला मात्र हिमेशच्या लोकप्रियतेच्या कसोटीवर उतरावे लागेल.

शुक्रवार, ऑगस्ट १८, २००६

॥ माझ्या ब्लॉगचा श्रीगणेशा ॥

बंगलोर की पुणे

मी पुण्याचा आहे. गेली पाच वर्षे बंगलोरला नोकरीसाठी राहतो आहे. पुण्याला परत जायचं हे आल्यापासून मनात पक्कं आहे. मात्र प्रत्यक्ष पुण्याला परत जायचं हा निर्णय फार सोपा आहे असं नाही.

मी ज्या क्षेत्रात काम करतो त्यातल्या दोन-चारच कंपन्या पुण्यात आहेत. पुन्हा पगार आणि काम चांगलं असेल का आणि नसलं तर परत बंगलोरला तर जायला लागणार नाही ना अशी भीती आहेच.

पुण्यात राहणीमान बंगलोरपेक्षा स्वस्त आहे असा माझा गोड गैरसमज होता. पण पुणं आयटी मध्ये मागे नाही हे जगाला पटवून देण्यासाठी पुण्यातील जागांच्या किंमती बंगलोरच्या बरोबरीत वाढल्या आहेत. नाही म्हणायला, घरचं जेवण असेल त्यामुळे बाहेर खाण्याचा खर्च वाचेल.

गेल्या पावसाळ्यात बंगलोरमधील माझ्या राहत्या घरात गटाराच्या पुराचं पाणी शिरलं. यापेक्षा पुणं बरं असं म्हणता म्हणता यंदाचा पावसाळा आला. यावर्षी पुण्यात पूर आणि बंगलोर कोरडं ठणठणीत!

पुण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल न बोललेलंच बरं. त्यावर इतकं लिहून आणि बोलून झालं आहे की त्या शब्दांनी ते खड्डे भरून टाकता येतील. बंगलोरमध्ये मात्र पाऊस न आल्यामुळे नवे कोरे गुळगुळीत डांबरट रस्ते दिमाखात मिरवत आहेत.

थोडक्यात काय तर मूलभूत सोयी-सुविधांच्या कुठल्याही कारणासाठी पुण्याला जाणं विशेष शहाणपणाचं नाही.

पण तरीही पुण्याला तर जाणार आहेच. अश्या असंख्य कारणांसाठी की जी फक्त वेडेपणाचीच आहेत.